सुवर्णकाळाने दिलेला आनंद अविस्मरणीय   

सुलभा तेरणीकर यांचे प्रतिपादन 

पुणे : एखाद्या चित्रपटाची निर्मिती करताना दिग्दर्शक व निर्मात्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. तसेच, त्या चित्रपटांमध्ये अभिनय करणार्‍या कलाकारांना चित्रपटाला साजेसी कला सादर करावी लागते. यासह संगीत आणि नृत्य देखील तितकेच चांगले असायला पाहिजे. या सर्वांचा मेळ चित्रपटात असला की, चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतो. चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात अशा चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. तो अविस्मरणीय काळ आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी रविवारी येथे केले. 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ’वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्राचे सातवे पुष्प सुलभा तेरणीकर यांनी ’लोकप्रिय सिनेमा, लोकप्रिय संगीत’ या विषयावर गुंफले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सध्याच्या घडीला ११३ वर्ष चित्रपटाला झाली आहेत. आजही अनेक सशक्त चित्रपटे येतात. 
त्याचा आस्वाद आजही शेकडो प्रेक्षक घेत आहेत. ३० च्या दशकांत एखाद्या चित्रपटाची निर्मिती अथवा ध्वनीमुद्रन करायची असेल तर त्याला वर्ष, महिने अपार कष्ट करावी लागत होती. त्यामध्ये निर्मात्यांपासून ते कलावंतापर्यंत सर्वांचे योगदान मोठे होते, असेही तेरणीकर यांनी स्पष्ट केले.
 
तेरणीकर म्हणाल्या, अभिनेता राज कपूर यांनी सिनेसृष्टीत प्रदार्पण केल्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर शेकडो प्रेक्षकांची मने जिंकली. माझा चित्रपट सगळ्यांना कळावा, समजावा अशी त्यांची भूमिका होती. प्रेक्षकही त्यांच्या चित्रपटांना पसंती देत असत. शास्त्रीय संगीतावर सुध्दा त्यांची चांगली पकड होती. यासह अभिनेता व निर्माते गुरूदत्त यांना चित्रपट आणि संगीताची आवड होती. त्यांनी अनेक चित्रपटातून संगीताच्या माध्यमातून अभिनयाचा ठसा उमटवला. तसेच, ते नृत्यशिक्षक म्हणून देखील काही काळ प्रचलित होते. गुरूदत्त यांची वेगळी अशी भूमिका होती. त्या भूमिकेद्वारे त्यांचे सादरीकरण व्हायचे. देव आनंद हे चिरतरूण संगीत देणारे कलाकार होते. चिरतरूण संगीताची झलक त्यांच्या अनेक चित्रपटातून दिसून येते. देवा आनंद हे प्रेमाच्या दृश्यातून आपल्या नायिकांसोबत अधिक प्रामाणिकपणे वागत असत. त्यांनी आपल्या अभिनयचा देखील एक वेगळा असा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. 
 
सुलभा तेरणीकर यांनी १९३० च्या दशकातील ’कुंकू’ या चित्रपटापासून आपल्या भाषणात सुरूवात केली. ’अलबेला’, ’सीआयडी’, ’कागज के फुल’, ’चलती का नाम गाडी’ या चित्रपटातील दृश्यांद्वारे त्यांनी दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, नृत्य आणि संगीतांचा उलगडा केला. तेरणीकर म्हणाल्या, विमल रॉय, नौशाद, किशोरकुमार, व्ही. शांताराम यांनी देखील त्या काळात प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. त्या काळात सुध्दा एखादा चांगला भव्य चित्रपट निर्माण व्हावा, अशी भूमिका नौशाद यांची होती, असेही तेरणीकर यांनी नमूद केले. सूत्रसंचालन डॉ. स्नेहा जोशी यांनी केले. 

Related Articles